राधानगरी तालुक्यातील ९ सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यातील विशेष भौगोलिक परिस्थिती पाहता ९ विविध योजनांच्या कामांसाठी ५८ कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर यांचेसह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, सचिव (लाभक्षेत्र विकास) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे ५८ कोटी रुपये किंमतीच्या ९ योजनांच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे ३४७ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. पालबुद्रुक, नवरसवाडी, पंदीवरे, दुर्गमानवाड इत्यादी भागातील पाझरतलाव, साठवणतलाव, उपसासिंचन योजना, कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधणे आदींसाठी सुमारे ५८ कोटी रुपये खर्चावरील स्थगिती उठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राधानगरी मतदार संघातील १५ उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण कामांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. तसेच भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटल्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ४५ कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उर्वरित १०० कोटींच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावावर सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कालवे आणि साठवण तलावांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज असून पिण्यासाठी आणि शेतीसाठी लाभ व्हावा याकरिता योग्यप्रकारे पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी जलसंपदा-जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.

 

Share