शिवसेना उपनेतेपदी प्रकाश पाटील; शिंदेंनी रात्री ३ वाजता दिले नियुक्तीपत्र

मुंबई : ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री ३ वाजता त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले.

प्रकाश पाटील हे गेली १२ वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत होते. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या संघटन कौश्यल्याचा नक्कीच पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.

दुसरीकडे, बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची देखील बदलापूर शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बदलापूर अंबरनाथ परिसरात शिवसेनेला अधिक बळ देण्यासाठी नक्कीच होईल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर वामन म्हात्रे यांनी बदलापूरमधील सर्वच्या सर्व नगरसेवकांना घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.

Share