शिवसेनेला आपसात लढवून संपवण्याचा भाजपचा डाव : आ. भास्कर जाधव

मुंबई : विधानसभेत आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात बोलताना शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. शिवसेनेला आपसात लढवून संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आ. भास्कर जाधव यांनी यावेळी केला. तसेच एकनाथ शिंदेसाहेब, शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाभारत, रामायण आणि पानिपत युद्धाचा दाखला देऊन भाजपावर टीकेचे आसूड ओढले. त्यांनी राज्यात पुन्हा एकदा महाभारत घडणार, असे भाकित वर्तवले. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत. पानिपतच्या युद्धात एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशहासाठी लढत आहेत; पण दिल्लीचा बादशहा मात्र सहीसलामत आहे. मरताहेत ते फक्त महाराष्ट्रातील मराठी लोक. बादशहा मात्र सुखरुप आहे, असे आ.भास्कर जाधव भाजपला उद्देशून म्हणाले. एकनाथरावजी शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. या ठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील आणि संपेल ती फक्त शिवसेना संपेल, असेही ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना आ.भास्कर जाधव म्हणाले, यांचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर शिवसेना संपवणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम नाही. याची अनेक उदाहरणे मी सांगू शकतो. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मी आनंद व्यक्त करतो; पण शिवसेना कशी वाचवायची? यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, ही एवढीच भावना व्यक्त करतो.

पानिपतच्या लढाईत जे झाले, ते आता महाराष्ट्रात होणार आहे : भास्कर जाधव
पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, तर कुणाच्या हातात भोंगा दिला; पण सत्ता उलटली नाही, असेही आ. जाधव यांनी भाजपला सुनावले आहे.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यापासून तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी होती. राज्यात कोरोना संकट आले. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. एक विचारधारा आहे. राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिले जात नाही, तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात. मात्र, कोरोना संकटात तुमची प्रत्येक कृती ही विरोधातील होती. सकाळी सकार पडेल, पंधरा दिवसात पडेल, आज पडेल उद्या पडेल, असे म्हटले गेले. तुम्ही कधी कोणाच्या हातात भोंगा दिला, कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा दिला. कधी महाराष्ट्रात नूपुर शर्मा आणली. कधी महाराष्ट्रात हिजाब आणला. कधी कंगना राणौत आणली तर कधी सुशांतसिंह राजपूत महाराष्ट्रात आणला. या महाराष्ट्राची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला; पण सत्ता कायम राहिली, असे म्हणत आ. भास्कर जाधव यांनी भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला.

Share