मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंसह ९ बंडखोर मंत्र्यांना दणका

मुंबई : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दणका देत बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण झाला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांना अपात्र ठरविण्याच्या कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून ठाकरे सरकारच्या विरोधात संघर्षाची धार तीव्र केली आहे. शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत बंडखोर ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आज थेट दणका दिला. ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह सर्व ९ बंडखोर मंत्र्यांची खातीच काढून घेतली असून, खात्यांचे फेरवाटप करत बंडखोर मंत्र्यांकडील खात्यांचा तात्पुरता कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६-अ मध्ये ६-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नावांसमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

कॅबिनेट मंत्र्याकडील खातेवाटपातील बदल खालीलप्रमाणे 
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकरराव यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्र्याकडील खातेवाटपात बदल
राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील गृह (ग्रामीण) खाते संजय बाबुराव बनसोडे यांच्याकडे तर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खाती विश्वजित पतंगराव कदम, राज्य उत्पादन शुल्क खाते सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते विश्वजित पतंगराव कदम यांच्याकडे तर वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग खाती प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्याकडे, अन्न व औषध प्रशासन खाते सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील तर सांस्कृतिक कार्य खाते आदिती सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्याकडील महसूल खाते प्राजक्त प्रसाद तनपुरे, ग्रामविकास खाते सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील व बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाते आदिती सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्याकडील शालेय शिक्षण खाते आदिती सुनील तटकरे, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार ही खाती सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, महिला व बाल विकास खाते संजय बाबुराव बनसोडे तर इतर मागास बहुजन कल्याण खाते दत्तात्रय विठोबा भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Share