मुख्यमंत्र्यांनी उद्या ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी; आ. रवी राणांचे आव्हान

मुंबई : उद्या हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, तर ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचे पठण करावे. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि दिशा विसरले असतील तर आम्ही खासदार आणि आमदार ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करू आणि बाळासाहेबांचे विचार जागृत करू, असे रवी राणा म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसाचे पठण व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसा पठण होत नसेल तर ते चुकीचे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. ते दुसऱ्या दिशेने भरकटले आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालून राज्याला दिशा द्यावी, असेही राणा म्हणाले.

रवी राणांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर
आमदार रवी राणा यांच्या या आव्हानानंतर शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. फुकटे सल्ले आणि फुकटचे इशारे आम्ही ऐकत नाही. काय करायचे आहे ते आपआपल्या मंदिरात करा. दुसऱ्याचे बाप हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या कुठल्या बापांचा तुमच्यावर आश्रय आहे तो दिसतोय. अतिशहाणपणा वाढत चालला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नका. आम्ही शिवसैनिक अजून मेलेलो नाही. आम्ही आईचे दूध पिऊन आलो आहे. तुम्ही फक्त येऊन दाखवा, मग दाखवते शिवसैनिक काय आहे? तुम्ही ‘मातोश्री’वर येऊन तर दाखवा, असे खुले आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा यांना दिले आहे.

राज ठाकरेंच्या हस्ते उद्या पुण्यात महाआरती

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरचे भोंगे न उतरवल्यास देशभर हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा ठाणे येथे नुकत्याच झालेल्या ‘उत्तर’ सभेत दिला आहे. मनसेच्या सूरात सूर मिसळत भाजपही हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्याच्या हनुमान जयंतीला भाजप नेते मोहित कंबोज लाऊडस्पीकर्सचे वाटप करणार आहेत. त्यांच्याकडे लाऊडस्पीकर्ससाठी ९ हजार अर्ज आले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या शनिवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील खालकर चौक येथील मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेखही करण्यात आला आहे.

Share