काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली; पण शिवसेना हरली : भाजपचा हल्लाबोल

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली; पण शिवसेना हरली. भाजपने ही फक्त निवडणूक गमावली; पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले. हिंदुत्ववादी जनतेने या निवडणुकीत शिवसेनेला नाकारले, असा टोला भाजपने शिवसेनेला लगावला आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव १९ हजार ३०७ मताधिक्याने विजयी झाल्या. या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्यजीत कदम यांचा पराभव झाला. दरम्यान, या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल करीत, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली; पण शिवसेना हरली. हिंदुत्ववादी जनतेने या निवडणुकीत शिवसेनेला नाकारले, असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली; परंतु मतांचे गणित पाहायला गेल्यास २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपला मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचे उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काचे ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा इव्हीएम (EVM) वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे.

Share