शहरातील बांधकामे बंद राहण्याची शक्यता; बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा संपाचा ईशारा

औरंगाबाद : महावितरणचा दोन दिवसीय देशव्यापी संप सुरु आहे. हा संप संपत नाही तोच आता औरंगाबाद बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने संपाचा इशारा आज पत्रकार परिषद घेत दिला आहे. चार दिवसांचे हे कामबंद आंदोलन असणार आहे.  1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान हा बंद असणार आहे.  त्यामुळे हे चार दिवस शहरातील बांधकामे बंद राहण्याची शक्यता आहे.

या आहेत मागण्या,

जिल्ह्यातील सर्व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्सना व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि इमारत बांधकामाच्या दरात एकसूत्रता आणणे हा औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश आहे. अकुशल कामगारांच्या मजुरीत मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी 40 टक्क्यांची वाढ झालेली आहे. तसेच वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या किंमतीमुळे बांधकाम ठेकेदार अतिशय अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे आणि यावर बांधकामाच्या दरात वाढ होणे, हा एकमेव उपाय असल्याचे संघटनेचे मत आहे. बांधकाम क्षेत्र हे असंघटित क्षेत्र असल्यामुळे आमच्या मागण्या मांडण्यासाठी कुठलाही मंच उपलब्ध नाही. त्यामुळे जनता, बिल्डर्स, डेव्हलपर्सचे तसेच खासगी बांधकाम करणारे घरमालक यांचे लक्ष वेधण्यासाठी, अगदी नाईलाजाने आम्हाला औरंगाबादमधील सर्व प्रकारची बांधकाम चार एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

Share