कोरोना संसर्ग वाढतोय, काळजी घ्या! केंद्राच्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना सूचना

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारला केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाच राज्यांना पत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

पुरेशा प्रमाणात चाचण्या करा आणि बाधितांचे नमुने जिनॉम सिक्वन्सिंगसाठी पाठवा, अशा सूचना केंद्र सरकारकडून केरळ, महाराष्ट्रसह पाच राज्यांना करण्यात आल्या आहेत. इन्फ्लुएन्झासारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवा. कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी काळजी घ्या, असा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केल्या आहेत. गेला आठवडा संपत असताना देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ७०८ इतकी होती. आता ती २१ हजार ५५ वर पोहोचली आहे, असे राजेश भूषण यांनी पाच राज्यांच्या आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा इतक्या महिन्यांपासून महामारीविरोधात सुरू असलेल्या लढाईत आपण मागे पडू, असे या पत्रात नमूद केले आहे. केरळमधील ११, महाराष्ट्रातील ६, तामिळनाडूतील २ आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याचा उल्लेख पत्रात आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४ हजार ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तीन महिन्यांत पहिल्यांदाच देशात एका दिवसात ४ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांत १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख २४ हजार ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Share