शिवजयंती साजरी करताना कोरोना नियमांचे पालन करावे – भुजबळ

नाशिक :  कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले की,  शिवजन्मोत्सव हा सर्वांचा उत्सव असून हा उत्सव साजरा करतांना समाजात आनंद कसा वाढेल यावर भर देण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात यावे. शिवजयंती उत्सव साजरा करतांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. प्रशासन व यंत्रणेला सर्वांना सहकार्य करण्यात यावे. अतिउत्साहाच्या भरात उत्सवाला कुठलही गालबोट लागत कामा नये. हा सर्व उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडेल यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करत सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शिवजन्मोत्सव समित्यांच्या असलेल्या विविध अडचणी समजून घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे निरासन केले. शहरातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवजन्मोत्सव समितीचे मामा राजवाडे, अंबादास खैरे, संदीप लभडे, नितीन रोठेपाटील, राम पाटील, संजय राऊत, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, जीवन रायते,  समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह शहरातील विविध ठिकाणच्या शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share