किरीट सोमय्यांना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे ते जामिनासाठी आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी लोकवर्गणीतून जमा केलेल्या निधीत अपहार केल्याच्या प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता, पण मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी घोटाळा करून ५८ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते, परंतु आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली असता, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली होती.

संजय राऊतांनी या प्रकरणातील कागदपत्र समोर आणल्यानंतर सोमय्यांविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याव्यतिरिक्त किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधातील फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

 

ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांवर बजावली होती. मात्र, आपण कार्यालयीन कामकाजात व्यस्त असल्याने चौकशीला येण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, अशी विनंती करणारे पत्र सोमय्यांनी आपल्या वकिलामार्फत पाठवले होते. तसेच सोमय्या पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज ११ एप्रिल रोजी सुनावणी झाली. सकाळी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाला होता, पण न्यायालयाने निर्णय संध्याकाळपर्यंत राखून ठेवला होता. आता त्यावरील निकाल देण्यात आला असून, न्यायालयाने किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांकडून दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Share