भारतातील ७० वेबसाईट्सवर परदेशातून सायबर हल्ले; बँकाच्या वेबसाईटस धोक्यात

मुंबई : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेने भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून सायबर गुन्हेगारांनी भारतातील वेगवेगळ्या वेबसाईट्सला आपले लक्ष्य केले आहे. देशातील वेगवेगळ्या शासकीय आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरून सायबर हल्ले होताना दिसत असून, अनेक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ५० वेबसाईट्स हॅक झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये अगदी नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्थेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्या अनेक वेबसाईट्सवर वादग्रस्त संदेश झळकत आहे. ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत. यामध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट आणि कृषी संशोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे.

सायबर हल्ले करण्यात आलेल्या ७० पैकी ५० वेबसाईट्स महाराष्ट्रातील

या वेबसाईट्सबरोबरच इतरही अनेक वेबसाईटसवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक, दोन नाही तर तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. सायबर हल्ला केलेल्या वेबसाइट्सच्या यादीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, भवन्स आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. सायबर हल्ले करण्यात आलेल्या ७० पैकी ५० वेबसाईट्स या महाराष्ट्रातील आहेत. यापैकी अनेक वेबसाईट्सवर या हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केली आहे. यामध्ये, “तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे,” असा संदेश ऐकू येत आहे.

भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्याचे मुस्लिम हॅकर्सला आवाहन

या हॅकर्सने जगभरातील मुस्लिम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्याचे आवाहनही केले आहे. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांनीही या हल्ल्यामध्ये सहभागी व्हावे, असे ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ने म्हटले आहे. रविवारी रात्री उशिरा भारतातील इस्त्रायलच्या दुतावासाला वेबसाईट रिस्टोअर करण्यात यश आले आहे. मात्र, त्यावरील काही पेजेसवर अद्यापही तांत्रिक अडचणी कायम आहेत.

भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले 
‘वर्ल्ड वाईड’ वेबवरील डिजिटल यंत्रणेवर तसेच इंटरनेटसंदर्भातील हलचालींवर लक्ष ठेवणाऱ्या वेबॅक मशीनने ८ जून ते १२ जून दरम्यान भारतीय सरकारी साईट्स तसेच खाजगी पोर्टल्स विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतातील अनेक बँकांच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा दावा सुरक्षातज्ज्ञांनी केला आहे. १३ हजारांहून अधिक सदस्य असलेल्या याच हॅकटिव्हिस्ट ग्रुपने भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे.

असेच हल्ले ‘१८७७’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुसर्‍या हॅकर्स ग्रुपनेही केले होते. त्यांनी इतर पोर्टल्ससह महाराष्ट्रातील विधी अकादमीची वेबसाईटही हॅक केली आहे. “आम्हाला भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही. ते त्यांचा धर्म निवडण्यास स्वतंत्र आहेत; पण आम्ही त्यांना आमच्या धर्मावर (इस्लाम) आक्रमण करू देणार नाही”, असा मेसेज या वेबसाईटवर या ग्रुपने टाकला होता. जून-जुलै २०२१ मध्येदेखील ‘ड्रॅगनफोर्स’ने इस्त्रायली सरकारच्या वेबसाईट्सवर अनेक हल्ले केले होते.

“हे राजकीयदृष्ट्या प्रेरित हॅकर्स असून आणि त्यांना देशांचा छुपा पाठिंबा असतो. असे हल्ले हे भविष्यात डेटा चोरी आणि बँकिंग आणि गंभीर पायाभूत सुविधांवरील रॅन्समवेअर हल्ले होऊ शकतात, असे सूचित करतात. सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी. जेव्हा त्यांनी इस्रायली साईट्सवर हल्ला केला तेव्हा त्यांनी इस्रायली कंपन्यांचा वैयक्तिक डेटा, पासपोर्ट डेटा आणि व्हीपीएन क्रेडेन्शियल्स लीक केले होते. आपण येत्या काही दिवसांत आणखी सायबर हल्ल्यांसाठी तयारी केली पाहिजे,” असे सायबर सुरक्षातज्ज्ञांनी सांगितले.

Share