‘बाबा, तुमची खूप आठवण येत आहे, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे…’

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (२६ मे) ७७ वी जयंती. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सुपुत्र आणि बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘बाबा तुमची खूप आठवण येत आहे, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे’, असे म्हणत रितेशने सर्वांना भावुक केले आहे.

रितेश देशमुख कायमच आपल्या भावना समाज माध्यमांवर मांडत आलेला आहे. विलासरावांचे कपडे हातात घेऊन त्याने केलेला व्हिडीओ अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे. अशातच त्याने आज वडिलांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एक भावनिक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच त्याने एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रितेशची दोन मुले विलासराव देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहेत. रितेशची ही पोस्ट पाहून त्याचे त्याच्या वडिलांवर असणारे प्रेम स्पष्टपणे दिसून येते.

https://www.instagram.com/p/CeArNqgDoIN/?utm_source=ig_web_copy_link

रितेशने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, “मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची खूप आठवण येत आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या पायांना स्पर्श करून मला आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला पुन्हा एकदा हसताना बघायचं आहे. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तुझ्याबरोबर मी नेहमीच आहे असं तुमचं बोलणं मला ऐकायचं आहे. हात धरत मला तुमच्याबरोबर चालायचं आहे. तुमचे पाय दाबत तुमच्याकडे एकटक पाहायचं आहे. मला तुम्हाला खेळताना, विनोद करताना, नातवंडांना खेळवताना, त्यांना गोष्टी सांगताना पाहायचं आहे. मला खरंच तुम्ही आता माझ्यासोबत हवे आहात.”

रितेश देशमुखने आयुष्यात बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नाही; परंतु एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्या नसण्याची उणीव त्याच्या मनात कायम आहे. ते म्हणजे त्याचे वडील विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांनी केवळ कुटुंबावरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रावर भरभरून प्रेम केले. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा. कॉँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते. विलासराव देशमुख यांचा जन्म २६ मे १९४५ रोजी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला होता. बाभळगावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास राहिला. काँग्रेस पक्षाचे ते दिग्गज नेते. विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. जिल्हा पंचायत सशक्तीकरण व पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याचे श्रेय त्यांना जाते. महिला आणि तरुणांच्या सबलीकरणासाठी त्यांनी स्वतंत्र धोरण राबविले. ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. हजरजबाबी, उत्कृष्ट वक्तृत्व, संघटन कौशल्य, अमोघ वाणी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, उत्तम प्रशासकीय कौशल्य असणारे लोकनेते विलासराव देशमुख यांना १४ ऑगस्ट २०१२ रोजी देवाज्ञा झाली.

रितेशने वडिलांसाठी शेअर केलेली ही खास पोस्ट खरंच डोळे पाणावणारी आहे. रितेश वडिलांना खूप मिस करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रितेश देशमुख नेहमीच वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनाही पसंती दिली आहे. रितेश आपल्या वडिलांबाबत प्रत्येकवेळी भरभरून बोलताना दिसतो. विलासरावांनी आजवर केलेले कौतुकास्पद काम याचा त्याला खूप अभिमान आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा रितेशने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

Share