‘दादा जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या’

मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांना “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा ”, असा खोचक सल्ला दिला आहे. यावरून त्यांच्यावर आता राष्ट्रवादीतील नेतेमंडळीकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनीही आता चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चव्हाण यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. त्या म्हणतात, बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही”,अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा अन्यथा मसणात जा. पण आरक्षण द्या. तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसेच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटले होते. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

Share