मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे समर्थक, मराठा संघटना आणि सकल मराठा समाजात शिवसेनेच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. ”मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…,” असे संभाजीराजे छत्रपती यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. राज्यातील सर्व आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. राष्ट्रवादीने कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळात संभाजीराजेंना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले. मात्र, नंतर यावरून यू टर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दिला.

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीने निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावत अपक्ष म्हणूनच लढण्याचा निर्धार केला. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढवल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपने देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेले नव्हते. शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय सुरू केला आणि महाविकास आघाडीने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका ज्येष्ठ भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या उमेदवारीवरून फसवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. याचे गंभीर परिणाम शिवसेनेला आगामी काळात भोगावे लागतील, असा इशारा संभाजीराजे समर्थकांनी व मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने घातलेली अट आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून एक पोस्ट केलीय. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…”, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संभाजीराजेंनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेच्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टची राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार?
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नव्हे तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. अर्ज भरताना ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजे यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले आहे, अशी चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी संभाजीराजे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच त्यांची आगामी वाटचाल कशी राहील, हेही स्पष्ट करतील, असे बोलले जात आहे. आगामी काळात ते ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

Share