शिवसेनेला त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत

मुंबई : केंद्रातील भाजप सरकार शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करीत आहे; पण याचा आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. केंद्रातील भाजप सरकारने कितीही सूडाने कारवाई केली तरी आम्ही डगमगणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ‘ईडी’ ने आज गुरुवारी सकाळी छापे टाकले आहेत. ‘ईडी’ने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले की, अनिल परब आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत; पण त्यांना कोणी हात लावत नाही. अनिल परब आमचे सहकारी आहेत. आम्ही सर्वजण पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, तसेच सर्व निवडणुकाही सुरळीत पार पडतील, असे राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षांत कधी लागले नव्हते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कारवाया फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहेत. तुमच्या हातात केंद्रीय तपासयंत्रणा आहेत म्हणून राज्यातील विरोधकांना नामोहरम करू, असे केंद्राला वाटत असेल तर तो समज चुकीचा आहे. शिवसेनेचे मनोबल अशा कारवायांनी खच्ची होणार नाही. उलट अशा प्रत्येक कारवाईसोबत आमचे मनोबल वाढेल. आमच्याकडेही भाजपच्या असंख्य नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत. नवलानीला कोणी पळवले याचे उत्तर सबळ पुरावे आहेत म्हणणाऱ्यांनी द्यावे. आम्ही लवकरच टॉयलेट घोटाळ्यासह अन्य घोटाळे बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला.

मी सातत्याने तक्रार देत असून त्यावर साधे उत्तर येत नाही. ‘विक्रांत’ घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो. शौचालय घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. माझ्यावर मानहानीचा दावा टाकला म्हणून मी माघार घेणार नाही. इतर काही प्रकरणात आम्ही हात घातला आहे. आम्ही ‘ईडी’कडे फाईल पाठवली असून ती उघडून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. आम्हीसुद्धा पाहून घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी याप्रसंगी दिला.

Share