अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा : सदाभाऊ खोत

सांगली : “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याला फार मनावर घेण्याची गरज नाही,” अशा शब्दात माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली. सदाभाऊंच्या या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

हनुमान चालिसा, भोंगे यावरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी कडकनाथ कोंबडीचा उल्लेख करत सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला होता. सांगली येथे सदाभाऊंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिले. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. ‘तोडा, फोडा’ अशी राष्ट्रवादीची नीती आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते जातीवाद निर्माण होणारी विधाने करतात तर दुसरीकडे शरद पवार साहेब आपले तारणहार आहेत, हे समाजाला समजावण्याचे काम करतात, अशी टीका खोत यांनी केली.

खोत म्हणाले की, महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही;परंतु एक शकुनी मामा सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामांचा सुळसुळाट असतो, त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती
काल मुख्यमंत्री एका शिवसैनिक आजीला भेटले त्यावरूनही खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. एक आजीबाई आली आणि डायलॉगबाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रात अनेक आजीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसायला वेळ मिळाला का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राणा दांपत्यावर गुन्हे दाखल केले जातात. मग पवारसाहेबांच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले? ते सर्वसामान्य लोक होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे गुंडाराज सुरू झाले आहे, असेही खोत म्हणाले.

“जागर शेतकऱ्याचा, आक्रोश बहुजनांचा” हे राज्यव्यापी अभियान २९ एप्रिलपासून कोकणातून सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाविकास आघाडी सरकारची केवळ फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार नोकर भरतीमधील गैरप्रकारावर काहीही बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

Share