मराठवाड्यात पहिल्यांदाच रुग्णाला बेशुद्ध न करताच हृदयावर शस्त्रक्रिया

औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात दोन रुग्णांना पूर्णपणे बेशुद्ध न करता हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. अशी शस्त्रक्रिया मराठवाड्यात प्रथमच झाली . याबाबतची हृदयरोगतज्ज्ञ डॉ. योगेश बेलापूरकर, भूलशास्त्रतज्ज्ञ डॉ. नागेश जंबुरे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतुन माहिती दिली.

एमजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका ७५ वर्षीय रुग्ण व ३३ वर्षीय महिला रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. बेलापूरकर म्हणाले, “७५ वर्षीय रुग्णास मधुमेह, रक्तदाब आणि अतिधूम्रपानामुळे फुप्फुसाचा आजार होता. रुग्णाची अँजिओप्लास्टी झालेली होती. आता पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये गाठी आढळल्या होत्या. महिला रुग्णास जन्मत: हृदयातील छिद्रामुळे फुप्फुसावर दाब वाढला होता. फुप्फुसाचा आजार असेल, तर हृदय शस्त्रक्रिया करताना पूर्णपणे भूल दिली, तर अडचणीची ठरू शकते. त्यामुळे पाठीच्या कण्यात भुलीचे इंजेक्शन देऊन या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.”

शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे जागे होते. कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता भासली नाही. एका रुग्णाची शस्त्रक्रिया हृदय चालू असताना करण्यात आली, तर दुसऱ्या रुग्णाची शस्त्रक्रिया हृदय थांबवून करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. सुहृद अन्नछत्रे, डॉ. अजिता अन्नछत्रे, डॉ. जुबेर खान, डॉ. विजय व्यवहारे, योगेश चव्हाण, अनिल माळशिखरे, अपेक्षा कोठावदे, वैशाली राऊत आदींनी मदत केली.

Share