संत सोपानदेवांच्या पालखीचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीने शनिवारी (२५ जून) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. दुपारी दीड वाजता सासवड येथील संत सोपानदेवांच्या समाधी मंदिराजवळ असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. टाळ मृदंगाच्या तालावर नाचण्यात तल्लीन झालेले वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम व सोपानदेवांचा जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे दोन दिवस मुक्काम होता. शनिवारी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. संत सोपानकाका व चांगावटेश्वर या दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रस्थान असल्याने व त्यातच ज्ञानेश्वर माऊली सासवड मुक्कामी असल्याने त्रिवेणी संतदर्शनाचा लाभ वारकऱ्यांनी घेतला. सकाळी ११ वाजता संत सोपानदेव प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींचा नैवेद्य सोपानकाकांच्या मंदिरात आणण्यात आला. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. सोहळा प्रमुख ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी यांनी मानकरी व दिंडीप्रमुखांना मानाचे श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी दिंडी प्रमुख व हजारो भाविक उपस्थित होते.

टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा माऊली तुकाराम व संत सोपानदेवांचा जयघोष करीत वारकरी आनंदाने नाचत होते. शनिवारी पहाटे चार वाजता मंदिरात समाधीची काकडआरती, पवमान अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम झाल्यानंतर वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दुपारी ज्ञानेश्वर माऊलींकडून परंपरागत मानाचा नैवेद्य आल्यावर कीर्तन झाले. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका बँक व अन्य संघटनांकडून आणि सासवड नगरपालिका यांच्याकडून दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर दिंड्यांमधून लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या साथीत सुरू असलेल्या टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात अवघी सासवडनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. संत सोपानदेव यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी हजेरी लावली. द्वादशी असल्याने सासवडमध्ये सकाळपासून दिंड्यांमध्ये उपवास सोडण्यासाठी पंगती पडल्या होत्या. दरम्यान, संत सोपानदेव यांच्या पालखीचे सासवडनगरीतून पंढरीच्या दिशेने दुपारी प्रस्थान झाले. त्या सोहळ्यात माउलींच्या सोहळ्यातील वारकरी सहभागी झाले होते. पुणे ते सासवड हा मोठा टप्पा वाटचाल केल्याने आज वारकऱ्यांनी तळावर विश्रांती घेणे पसंत केले. पालखी तळावरील ओपन जीमच्या साहित्याचा वारकऱ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. दुपारनंतर भजन, कीर्तनाचा आनंद पालखी तळावर घेताना वारकरी दिसत होते. संत सोपानदेव यांची पालखी सासवड नगरीतून खांद्यावर नेऊन जेजुरी नाक्यावर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली व सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या विविध भागातील ९७ मानाच्या दिंड्या आहेत, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.

संत सोपानदेव यांच्या पालखीबरोबरच संत योगीराज चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचेही सासवडमधून दुपारी दीड वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखीच्या पुढे व मागे मानाच्या दिंड्या आहेत. पारगाव मेमाणे, यवत, इंदापूरमार्गे हा सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे.

Share