संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीसाठी जेजुरीकडे

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी एक-एक टप्पा पार करत पंढरीच्या दिशेने जात आहे. रस्त्यात प्रत्येक ठिकाणी हजारोंच्या संख्येने स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथात विराजमान असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. संत सोपानदेव काकांच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीसाठी आज रविवारी (२६ जून) जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आज जेजुरीमध्ये मुक्काम राहणार आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे आषाढी वारी निघाली नव्हती. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी निघाला आहे. श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील दोन दिवसाचा विसावा पहिल्यांदा पुण्यात आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या सासवडमध्ये होत असतो. सासवडमधून सोपान काकांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माऊलींचे प्रस्थान होत असते.

ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला निरोप देताना माऊलींची पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. एकूण पालखी मार्गामध्ये माऊलींच्या प्रस्थानावेळी रथातच माऊलीला निरोप दिला जायचा. मात्र, सासवडकर आपल्या खांद्यावरून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान करतात. सासवडमध्ये पालखी खांद्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याची प्रथा आहे. यंदाही प्रथेप्रमाणे सासवडकरांनी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गावच्या वेशीवर आणली आणि पुन्हा रथामध्ये ठेवली.

शनिवारी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. शनिवारी दिवसभर पुरंदर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. रात्रीची कीर्तन सेवा वालूरकर दिंडीतर्फे करण्यात आली. आज रविवारी सकाळी सातच्या सुमारास संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी जेजुरीकडे मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या भेटीची आस लागलेली आहे. सासवडहून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचायला सुरू झाले आहेत. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांना विस्तीर्ण असा पालखी मार्ग मिळाला. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना वारकरी मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या भेटीसाठी जणू आतुर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली-तुकोबांच्या जयघोषासोबतच आता येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत दणाणून निघत आहे. सासवडहून निघालेला हा वैष्णवांचा मेळा सकाळी बोरावके मळा येथे पोहोचला. सासवड ते जेजुरी या मार्गातील हा पहिला न्याहारीचा विसावा. त्यानंतर दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वारकरी यमाई मंदिर परिसरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी आणि वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले आणि घटकाभर विश्रांती घेऊन पालखी सोहळा पुढे जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. साकुर्डीचा टप्पा ओलांडला की, खंडोबाच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी वायुवेगाने पावले टाकतात. अखंड लवथळेश्वर मंदिराजवळ पालखी पोहोचताच या ठिकाणाहून मल्हारी मार्तंडाचा गड दिसला की, येळकोट येळकोट जय मल्हारचा एकच जयघोष होतो.

रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी नगरीमध्ये पोहोचणार आहे. पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळला गेल्यानंतर माऊलीची पालखी पिवळी होताना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध या पालखी मार्गावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी आजचा या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.

Share