शेगाव, (बुलडाणा): गण गण गणात बोते…विठ्ठल, माऊली, तुकाराम असा गजर करीत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी आज सोमवारी (६ जून) सकाळी साडेसात वाजता शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन वर्षांच्या खंडानंतर संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी ‘श्रीं’च्या पालखीला पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. मानाच्या अश्वांसह ७०० वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ‘श्री’च्या पालखीचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविक संतनगरीत दाखल झाले होते.
संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे हे ५३ वे वर्ष आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे आषाढी वारीच्या सोहळ्यात खंड पडला होता. मात्र, दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. आज सोमवारी सकाळी साडेसात वाजता शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातून पालखी आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाली.
नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते ‘श्रीं’च्या पालखीचे विधिवत पूजन
गेल्या वर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन झाले. शिवशंकर बापूंच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नीळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा व आरती करून ‘श्रीं’च्या पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या. मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मंदिरातून निघालेला पालखी सोहळा यंदा ‘श्री’ च्या प्रकट स्थळावर गेला नाही. थेट पालखी नागझरी रोडवरील अशोक देशमुख यांच्या मळ्यात पोहोचली. तेथून ‘श्रीं’ची पालखी पुढे नागझरीकडे मार्गस्थ झाली. यावेळी संतनगरीतील हजारो भक्तगणांनी ‘श्रीं’च्या पालखीला प्रेमाने निरोप दिला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शेगावसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले होते.
संत गजानन महाराजांच्या पालखीने आज दुपारी श्रीक्षेत्र नागझरी येथे विसावा घेतला. यानंतर रात्री पालखीचा मुक्काम पारस येथे असणार आहे. उद्या ७ जूनला दुपारी पालखी गायगावसाठी प्रस्थान करेल, तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. या दिंडी सोहळ्यात सातशे वारकरी सामील झाले आहेत. ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून, तब्बल ७५० किलोमीटर अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे. अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातूर, मेडशी, श्रीक्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढामार्गे ८ जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल.
पालखीचा परतीचा प्रवास
९ ते १२ जुलैपर्यंत पालखीचा पंढरपूर येथे मुक्काम राहील. त्यानंतर करकंब, कुर्डूवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेड राजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार, खामगाव मार्गे ३ ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परत येईल. श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किलोमीटर आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकूण प्रवास १२७४ किलोमीटरचा पालखीचा प्रवास आहे.
विशेष कारागिरांनी तयार केली पालखी
शेगाव संस्थानने श्री गजानन महाराजांची चांदीची पालखी बनारस येथील कारागिरांकडून तयार करवून घेतली आहे. त्यावरील आकर्षक नक्षीकाम कलाकुसरीने परिपूर्ण आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मात्र परंपरेत खंड न पडू देता मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना विठू माऊलीच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.