रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोशात, महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमले

पुणे : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रागयड परिसर दुमदुमला. सोहळा पाहण्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी पहायला मिळाली.

संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र,  मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पद्धतीमुळे लोकसंचय वाढला. शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे ‘स्वराज्य’ उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी आधी ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून राज्याभिषेक सोहळा पार पडला.

Share