‘पांडुरंग, एकनाथ, भानुदास’ च्या नामघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

औरंगाबाद : महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांच्या पालखी सोहळ्याचा मान असलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे सोमवारी (२० जून) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगांच्या गजरामुळे यावेळी वातावरण भक्तिमय बनले होते. दोन वर्षांच्या खंडानंतर संत एकनाथ महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पैठण येथून पंढरपूरकडे रवाना झाली. एकोणीस दिवसांनंतर संत एकनाथ महाराजांची पालखी ९ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.

प्रथेप्रमाणे सोमवारी सकाळी पैठण येथील नाथ मंदिरात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीला सजवून विधिवत पूजन करण्यात आले. नाथांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. पालखीची गावातील नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली. समाधी मंदिरात पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दुपारी चार वाजता पालखी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर वारकरी, भाविक व गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी नाथांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काल सोमवारी सूर्यास्ताच्या वेळी हजारो भाविक, वारकरी व पैठण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नाथांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. याप्रसंगी काही काळ पावसाने हजेरी लावली.

भक्तीरसाने चिंब झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘पांडुरंग, एकनाथ, भानुदास’ चा नामघोष करीत संत एकनाथांच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पंढरपूरला पायी दिंड्या निघाल्या नव्हत्या. यंदा कोरोना निर्बंधाशिवाय संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पायी पंढरपूरला निघाला आहे. दोन वर्षानंतर पायी वारीत सहभागी होता आल्यामुळे वारकरी, भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.

नाथवंशजासह, रघुनाथबुवा पालखीवाले यांची नाथ पादुकांची पालखी दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले होते. तब्बल १९ दिवस पायी दिंडीचा प्रवेश करत ही दिंडी पंढरपूरला ९ जुलैला दाखल होणार आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्यास पालखी प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी जि. प. सभापती विलास भुमरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष निमेश पटेल, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, नगर परिषदेचे मुख्यधिकारी संतोष आगळे, नंदकिशोर नजन, भूषण कावसनकर, जितू परदेशी, ज्ञानेश्वर कापसे, पवन लोहिया, बळीराम लोळगे, रेखा कुलकर्णी, दादा बारे, शेखर शिंदे, संतोष गव्हाणे आदींसह असंख्य भाविक उपस्थित होते.

संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शनिवारपासूनच विदर्भ, खान्देश व मराठवाडा भागातील अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या होत्या. चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगुसवाडा, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, अनाले, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोण मार्गे ही पालखी पंढरपूरला जाणार आहे. पालखी मार्गातील रिंगण सोहळा हे वारकरी, भाविकांसाठी चैतन्य निर्माण करणारे असते. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पाच रिंगण सोहळे होणार आहेत. ते मिडगाव, पारगाव, घुमरे नागरडोह, कव्हेदंड तर उभे रिंगण पंढरपूरला होणार आहे. ९ जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल. तेथे आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी झाल्यावर १२ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहील.

Share