मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे १५ आमदार हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे या १५ आमदारांसोबत गुजरातमध्ये आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे आणखी संभ्रम वाढला आहे.
काल सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला. फडणवीस यांच्या अचूक नियोजन आणि प्रभावी रणनीतीमुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटल्याचे समोर आले.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ३ तर सहयोगी अपक्षांची एकूण १२ मते फुटली. काँग्रेसची २ मते फुटल्याने काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये भाजपला चार उमेदवार निवडून येण्याची शाश्वती असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला १२३ मते मिळाली होती. आता विधान परिषद निवडणुकीत भाजपला १३४ मते मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि अपक्षांची मते फुटल्याने भाजपला अतिरिक्त २७ मते मिळाली आणि त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आला.
आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल १३ आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याने शिवसेनेत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे योगदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाग घेणार होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील येणार होते. मात्र, अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द झाला. त्यातच काल रात्री विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला उशीर झाल्यामुळे फडणवीस यांनी आपला नाशिक दौरा रद्द केला. त्यानंतर आता फडणवीस यांनी थेट दिल्ली गाठली असून, ते दिल्लीला का गेले आहेत याबाबत नक्की माहिती मिळू शकलेली नाही. ते दिल्लीत कोणाला भेटणार तसेच कोणत्या विषयावर चर्चा करणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या फोनवर कॉल केल्यावर गुजराती भाषेमध्ये मोबाईल सेवेची ट्यून ऐकू येत असल्याने ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असलेल्या सूरतमधील ला मेरिडीअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार ‘नॉट रिचेबल’ असताना शिवसेनेचे आणखी नऊ आमदार गुजरातला रवाना झाले असून अगदी काही वेळातच ते सूरतमध्ये पोहोचणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अशातच ‘नॉट रिचेबल’ असलेल्या एकनाथ शिंदे यांनी योग दिनानिमित्त एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असलेल्या कमळाच्या चित्रामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी एक फेसबुक पोस्ट करत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगा म्हणजे संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृद्धी जीवनाचा राजमार्ग, असे त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या फेसबुक पोस्टसोबत असलेल्या फोटोत मागे कमळाचे चित्र आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे खरेच बंड पुकारणार का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.