ऊन-सावल्यांचा खेळ हा निसर्गाचा नियमच; एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तेरा आमदार विधान परिषद निवडणुकीनंतर ‘नॉट रिचेबल’ झाले आणि आज शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ असे ट्विट केल्यानंतर शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. एकनाथ शिंदेंसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या गटामुळे शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन राज्यातील ठाकरे सरकार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ”निसर्गाच्या नियमानुसार हा ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे; पण लवकरच वातावरण निवळेल”, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, निसर्गाच्या नियमानुसार हा ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे; पण लवकरच वातावरण निवळेल. भाजपकडून केंद्रीय सत्तेचा, तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून राजकारण सुरू आहे. त्याचाच हा एक अध्याय आहे. भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत आहे हे लपून राहिलेले नाही. सत्तेतून पैसा आणि त्यातून अधिक सत्ता हीच त्यांची रणनीती राहिली आहे. भाजपने असत्याचा मार्ग घेतला आहे. यात सत्याचा विजय होईल. हे थोड्या वेळेचे आहे. ऊन-सावली हा निसर्गाचा नियम आहे; पण महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. हे सगळे लवकरच निवळेल आणि सारे काही व्यवस्थित होईल, असे नाना पटोले म्हणाले.

दिवसा बहुमताची स्वप्नं पाहणाऱ्या लोकांसाठी तो आकडा पार पाडणे हे अजून फार दूर आहे. महाविकास आघाडीला अजून कोणतीही अडचण आहे असे मी मानत नाही. आमच्या पक्षात काल जी बंडखोरी झाली, त्याचे आत्मपरीक्षण करून त्यासंदर्भात हायकमांडला माहिती दिली जाईल, असे म्हणत नाना पटोले यांनी विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मतदानाविषयी आपली भूमिका मांडली.

Share