मुंबई : राज्यात विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या आणि टीकाटिप्पणींचा समाचार घेत त्यास उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात ‘हुंकार सभा’ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाजपकडूनदेखील उत्तर दिले जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर म्हणजे १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.
‘हुंकार सभे’नंतर १५ मे रोजी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. या सभेतून आम्ही ‘हुंकार सभे’ ला काय उत्तर द्यायचे ते देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न हटवल्यास मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याचबरोबर खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. आज मुंबईच्या माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांच्या तपासण्याचे व्हिडीओ आणि फोटोंवरून रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले.
या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना आता आपण सरकारमध्ये आहोत, हे विसरून पुन्हा एकदा मूळ शिवसेनेच्या मूडमध्ये आलेली आहे. लोक याची दखल घेतील. याचबरोबर या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की, न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास देण्याचा आणि हम करे सो कायद्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.