शेततळ्यात बुडून तिघा चिमुकल्यांचा मृत्यू

सोलापूर : खेळता-खेळता शेततळ्यात पडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (९ मे) दुपारी सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता. मोहोळ) येथे घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा आणि त्यांच्या मित्राचा समावेश आहे.

विनायक भरत निकम (वय ११ वर्षे), सिद्धार्थ भरत निकम (वय ८ वर्षे) (दोघे रा. माचणूर, ता. मंगळवेढा) आणि कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ५ वर्षे, रा. शेटफळ) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. माचणूर (ता. मंगळवेढा) येथील भरत निकम हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतात सालाने कामाला आहेत, तर हिंगमिरे कुटुंब हे शेटफळ येथीलच आहे. सोमवारी डोंगरे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडणीचे काम सुरू होते. सिद्धार्थ निकम, विनायक निकम आणि त्यांचा मित्र कार्तिकेश हिंगमिरे हे तिघे शेततळ्याच्या शेजारी खेळत होते. ते बराच वेळ दिसले नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला असता तिघेही शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.

सिद्धार्थ, विनायक आणि कार्तिकेश या तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मराठी गावात तीन बालकांचा शेततळ्यामध्ये पडून मृत्यू झाला होता.

Share