‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर आणि चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचे स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तीक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. येत्या १३ मे रोजी हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.


एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा आनंद दिघे यांचा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आवडीची आर्माडा गाडी वापरण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकला देण्यात आलेला आनंद दिघे यांचा हुबेहुब लूक हा या चित्रपटाचे आकर्षण ठरत आहे. रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी हा विशेष मेकअप केला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार हवा तयार झाली आहे. प्रसाद ओक याला आनंद दिघे यांच्या व्यक्तिरेखेसाठी करण्यात आलेल्या मेकअपचे कौतुक होत आहे. हा मेकअप इतका परफेक्ट जमला आहे की, प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्या दिसण्यात थोडाही फरक राहिलेला नाही. त्यामुळे अगदी जुन्या शिवसैनिकांनाही आपण आनंद दिघे यांनाच समोर पाहत आहोत, असा भास होत आहे.

अन एकनाथ शिंदे प्रसाद ओकच्या पाया पडले!

या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या लूकमधील प्रसाद ओकला पाहून अगदी भारावून गेले. गाण्याचे लाँचिंग झाल्यानंतर स्टेजवर एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओक यांनी एकमेकांसोबत फोटो काढले. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांच्या रुपातील प्रसाद ओकला पाहून राहवलेच नाही आणि ते व्यासपीठावर सर्वांदेखत प्रसाद ओकच्या पाया पडले. हा प्रसंग सर्वांनाच भावूक करून गेला. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अत्यंत खास नाते होते. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. १९९७ साली आनंद दिघे यांनी शिंदे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट दिले आणि ते निवडूनही आले. त्यानंतर दिघे यांनी शिंदेंना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपदही दिले. एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात आनंद दिघे यांचा खूप मोठा वाटा होता.

प्रवीण तरडेंनी सांगितले प्रसाद ओकच्या निवडीचे खरे कारण
या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारलेल्या अभिनेता प्रसाद ओकचे सर्वजण कौतुक करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी प्रसाद ओकची निवड करण्यामागचे कारण सांगताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, “एखाद्या चित्रपटासाठी पात्राची निवड करताना, विशेषत: ती जर बायोपिक असेल तर त्या माणसाच्या दिसण्याच्या जवळ जाणारे पात्र निवडावे लागते;परंतु त्यासोबतच तो अभिनेताही असायला हवा. नाहीतर मी जसंच्या तसं दिसणारे पात्र घेतलं आणि त्याच्याकडून अभिनयच झाला नाही, तर लोकांनी काय बघायचं? त्यामुळे मला असा एक अभिनेता हवा होता जो ५० टक्के दिघे साहेबांच्या दिसण्याच्या जवळ जाईल. मी त्या अभिनेत्याच्या शोधात होतो. त्यानंतर मी पहिलीच ट्रायल प्रसादवर घेतली आणि ५० टक्के नाही तर तो १०० टक्के आनंद दिघे साहेबांच्या दिसण्याच्या जवळ गेला. दुसरं म्हणजे त्याच्यासारखा सर्वात जास्त अनुभव असलेला, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता, दिग्दर्शक मला मिळाला. त्यामुळे माझं काम सोप्प झालं”, असे प्रवीण तरडेंनी सांगितले.


या चित्रपटाबद्दल ते म्हणाले, “बायोपिक कोणतीही असली तरी तुम्हाला त्यावर मेहनत घ्यावी लागते. मी यादरम्यान अनेक माणसांना भेटलो. जवळपास १६८ मिनिटांचा एक ऑडिओ माझ्याकडे आहे. तो रोज ऐकून आणि त्यातले पॉईंट ऐकायचे. हे सगळं केल्यानंतर दिघे साहेब माझ्यासमोर उलगडत गेले. दिवस-रात्र मी काहीही पाहिलं नाही. फक्त झपाटल्यासारख काम करत होतो.”

Share