आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे, नादाला लागले तर २० फूट खाली गाडू!

नागपूर : “आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे आहोत, आमच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू. जर तुमची आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असेल तर मग तुमच्या गोवऱ्या अगोदर स्मशानात नेऊन ठेवा आणि मग मैदानात या”, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यासह भाजप नेत्यांना इशारा दिला.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर मुंबईतील शिवसैनिकही आक्रमक झाले आणि त्यांनी राणा दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या खार येथील घराला घेराव घातला. या सर्व घडामोडींमुळे मुंबईत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबईत येत असल्याने त्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही ‘मातोश्री’ वरील आमचे आंदोलन मागे घेत असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले. राणा दाम्पत्याच्या या भूमिकेनंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

बंटी, बबली आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?
पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी राणांवर टीकेचा बाण सोडला. श्रीरामाचं नाव घेण्यासाठी या बबलीचा विरोध होता. हे लोक आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? परत ‘मातोश्री’वर जाण्याची हिम्मत करू नका. ‘मातोश्री’ला आव्हान देणारा आणखी जन्माला यायचाय. आव्हान दिलं तर काय तऱ्हा होते, हे आज शिवसैनिकांनी दाखवून दिलंय, असे राऊत म्हणाले.

“आम्हाला आव्हान देण्याची भाषा करणारे राणा दाम्पत्य आणि त्यांना बळ देणारे भाजपचे नेते यांचा माज कशाच्या जीवावर आहे, केंद्रीय यंत्रणांच्या जीवावरच ना… आम्ही शिवसैनिक तर जन्मत: माजोरडे आहोत. आमचा माज काय आहे, हे तुम्ही जन्मत: पाहिलं. यापुढेही तुम्हाला माज दाखवू. आम्हाला पोलिसांची गरज नाही. आयुष्यभर आम्ही पोलिसांशी संघर्ष करतच इथपर्यंत पोहोचलो. पोलिसांची आणि आमची कधीच दोस्ती झाली नाही. पोलिसांचा आम्ही कधी वापरही केला नाही. आजही आम्ही लढाई करतो आहोत, ती पोलिसांच्या किंवा सत्तेच्या बळावर नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या मनगटात जो माज भरलाय, तो असाच राहील. परत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर स्मशानात गोवऱ्या रचून यायचं. अंगावर याल तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा राऊतांनी दिला.


नवनीत राणांना राऊतांनी दिले खुले आव्हान
खा. राऊत यांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली. बोगस जात प्रमाणपत्र असणाऱ्या खासदारांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. तसेच आम्ही सगळेच अमरावतीला जाऊ आणि अमरावती शिवसेनेची आहे की आणखी कोणाची आहे हे बघू, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Share