भाजपने इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली का? – संजय राऊत

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधाला आहे. शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? तुम्ही नवनवे शोध लावताय, भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? हे नवीन इतिहास लिहणार महाराष्ट्राचा, असा संतापत त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले की, कोण प्रसाद लाड? सोड रे… ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

या भाजपचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आहे ना, ही शक्तीच यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची ही तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळेच हे लोक बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे? महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहीत आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. रायगडावर त्यांची समाधी आहे. तुम्ही नवीन नवीन शोध का लावत आहात? भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले प्रसाद लाड?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

Share