गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?

नवी दिल्ली : भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात तणाव वाढला आहे. चीनचे सैन्य गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? देशातल्या निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितले होते. लडाख, डोकलाम झालं आणि आता तवांगला घुसले आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली. आता ते तवांगमध्ये घुसले. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारणाकडे थोडं कमी लक्ष देऊन देशाच्या सीमा असुरक्षित झाल्यात त्यावर लक्ष द्यावे. तिथे लक्ष दिले तर राष्ट्राची सेवा होईल अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लावून धरू. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू सीमेवर धडका मारतायेत. सरकार ही बाब गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय हे तवांगच्या घटनेवरून स्पष्ट दिसते. तवांगमध्ये ही झटापट शुक्रवारी झाली. ८ दिवसानंतर हे समोर आले. जखमी सैनिक आसामच्या गुवाहाटीत उपचार घेतायेत. सत्य काय ते कळायला मार्ग नाही. भारताचे किती सैनिक जखमी झालेत? कोण शहीद झालंय का? यावर अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही. जे गलवानबाबतीत झाले ते तवांगबाबतीत घडतंय असा आरोप त्यांनी केला.

तसेच आज सकाळी सगळे प्रमुख विरोधी पक्ष एकमेकांशी संपर्कात आहेत. त्याबाबत निश्चित आज संसदेत जाब विचारू. गुजरात निवडणूक निकालाच्या जल्लोषात हे सरकार मग्न असताना चीनचं सैन्य तवांगमध्ये घुसत होते. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे. अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करतंय. स्थानिकांनी तवांग भारताच्या नकाशावर ठेवले. चीनच्या नकाशात तवांग त्यांचा प्रदेश दाखवलाय. तिथे गांभीर्याने सरकारने काम करणे गरजेचे होते पण ते दिसत नाही असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, या प्रश्नावर पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. याआधीही गलवानवेळी उत्तर दिले. पण वारंवार चीन कुरापती करतंय. अशावेळी शत्रूना थरकाप उडवणारे सरकार असं ऐकायला मिळते. तवांगचे संरक्षण करा, अरुणाचलचे संरक्षण करा. त्याऐवजी मोठमोठ्या वल्गना करताना संरक्षणमंत्री दिसतात.. चीनसारखा शत्रू देशात घुसतोय आणि आपण पाकिस्तानवर बोलतोय. आपण चीनची मुकाबला केला पाहिजे. चीन पुढे जातोय आपले आंतरराष्ट्रीय धोरण चुकतंय का? याचा विचार होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेऊन देशाच्या सीमेकडे लक्ष द्यावं. आम्ही बोललो तर आम्हाला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं अशी टीकाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

Share