मुंबईत आजपासून जी २० बैठकांचे आयोजन

मुंबई : मुंबईत आजपासून सुरू झालेल्या जी २० परिषदेत मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते दुपारी एक या कालावधीत ‘डाटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा’ याविषयावर बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरच्या जास्मिन सभागृहात कार्यक्रम होईल.

दुसऱ्या सत्रात दुपारी दोन ते सायंकाळी पाच या कालावधीत ‘इनफ्यूजिंग न्यू लाइफ (लाइफस्टायल फॉर एन्व्हायरमेंट) इन टू ग्रीन डेव्हलपमेंट’ याविषयावर जिओ वर्ल्ड सेंटरमधील जास्मिन हॉलमध्येच कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम हॉटेल ताजमहाल पॅलेस येथील चेंबर्स टेरेस येथे होतील. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जी २० परिषदेसाठी आलेले प्रतिनिधी गेट वे ऑफ इंडिया परिसरात वॉक करतील.

सध्याच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण केवळ एकत्र काम करण्यानेच शक्य आहे. आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये केवळ जी-२० सदस्यांच्याच आकांक्षाचा समावेश नसून, जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या आकांक्षांचाही समावेश असल्याचे जी २० चे शेर्पा अमिताभ कांत यांनी माध्यमांना सांगितले. भारताच्या विकास कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांचा आराखडा कांत यांनी यावेळी सादर केला. यात हवामानविषयक कृती आणि अर्थसहाय्यासह न्याय्य ऊर्जा संक्रमण आणि ‘लाईफ’ (पर्यावरणपूरक जीवनशैली), शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देणे आणि डिजिटल सार्वजनिक सामग्री/विकासाकरिता डेटा यांचा समावेश आहे.

कर्जाचे ओझे, सुधारित बहुराष्ट्रवाद आणि महिला-प्रणीत विकास या मुद्द्यांचादेखील विकास कार्यगटाच्या बैठकीत समावेश असेल आणि भारत समावेशक विकासाचे आणि तो साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करेल, अशी माहिती कांत यांनी दिली. या बैठकांमध्ये शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी जी-२० च्या एकत्रित कृतीवर, विकसनशील देशांच्या अन्न-उर्जा सुरक्षेशी संबंधित समस्यांची तातडीने हाताळणी करण्यासाठी पाठबळ देण्यावर, कर्जामुळे पडलेल्या बोजाच्या संकटाचा मुद्दा यावरदेखील भर दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही राज्य सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या बैठकीला आलेल्या प्रतिनिधींसाठी मुंबईत कान्हेरी गुंफांमध्ये अभ्यास सहलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

Share