जवखेडा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

अहमदनगर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथील तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींमध्ये पित्यासह त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथे आठ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाची हत्या केल्याप्रकरणी तिघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली होती. संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील संजय जाधव या एकाच अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील तीन जणांच्या हत्येप्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव या तिघांना अटक करण्यात आली होती. अहमदनगर येथील जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील संजय जाधव या तिघांच्या हत्येप्रकरणी दिलीप जगन्नाथ जाधव याच्यासह त्याची दोन मुले प्रशांत दिलीप जाधव आणि अशोक दिलीप जाधव या तिघांची सबळ पुराव्याअभावी जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथे २० ऑक्टोबर २०१४ रोजी संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), त्यांची पत्नी जयश्री (वय ३८) व मुलगा सुनील (वय १८) अशा तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या तिघांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे विहीर व बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलि‍सांना मृतदेह काढण्यास दोन दिवस लागले होते. ही घटना समोर आल्यानंतर जवखेडासह संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील या तिघांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

 

Share