हिवाळ्यात या पालेभाज्या खात आहात ना ?

ऋतू जसा बदलतो तसा आहारही बदलतो. किंबहुना तो बदलायला हवा. थंडीतले वातावरण सुखदायक असले तरी या ऋतुमुळे होणार्‍या आजारांपासून वाचायचे असेल तर त्या प्रकारचे पदार्थ आपल्या जेवणाच्या ताटात असणे गरजेच आहे. बदलेल्या ऋतुप्रमाणे आवश्यक असलेली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम आहारातील भाज्या, पालेभाज्या करत असतात. हिवाळा हा ऋतू आरोग्य कमावण्याचा असतो. हे आरोग्य कमावण्यासाठी बदाम, अक्रोड, अंजीर यांच्याबरोबरीने या तीन पालेभाज्याही तितकीच मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात या भाज्या खाणं आपल्याकडून चुकणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

पालक

ही भाजी प्रत्येक ऋतूत खायला हवी आणि थंडीत तर आवर्जून खाल्लीच पाहिजे. पालकामधे फायबर, कर्बोदकं, लोह, प्रथिनं, ओमेगा ३, ओमेगा ६ ही महत्त्वची पोषक घटक असतात. ही भाजी हदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असून केस आणि त्वचेचं आरोग्यही ही भाजी सांभाळते. शरीरातील रक्ताची कमतरता या भाजीने भरुन निघते. तसेच अनेक रोगांशी लढण्याची ताकद पालकाच्या गुणधर्मात असते.

मेथी

मेथी ही औषधी भाजी म्हणून ओळखली जाते. या भाजीत अ, क , ब6 जीवनसत्त्व, पोटॅशिअम, फॉलिक अँसिड, फॉस्फरस, लोह ही पोषणमूल्यं असतात. थंडीत मेथीची भाजी खाल्ल्यानं सांधे दुखीवर आराम पडतो. तसेच संधिवाताच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते. या भाजीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रित राहातं. मेथीच्या भाजीच्या सेवनानं रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोकाही कमी होतो.

राजगिरा

राजगिरा या पालेभाजीत लायसिन नावाचं महत्त्वाचं अमिनो अँसिड असतं. एजिंग रोखण्यास हा घटक उपयुक्त ठरतो. या भाजीत फायटोन्यूट्रीएंटस, खनिजं आणि अनेक जीवनसत्त्व असतात. थंडीत ही भाजी अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचं संरक्षण करते

Share