‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन परतणार; प्रोमो व्हायरल

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका त्यातील कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत ‘गरबा क्वीन’ अर्थात दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही २०१७ पासून या मालिकेपासून दूर आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे; पण प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असून, आता लवकरच दयाबेन या मालिकेत परतणार आहे. नुकताच याबाबतचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून एकापाठोपाठ एक कलाकार बाहेर पडत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत; परंतु आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, या मालिकेत प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा दयाबेन पुन्हा दिसणार आहे. गेल्या अनेक भागांपासून प्रेक्षक जेठालालची बायको दयाबेनला मिस करत आहेत. ती मालिकेत कधी परतणार, असा प्रश्न सातत्याने निर्मात्यांना, दिग्दर्शकाला विचारण्यात येत होता. मात्र, त्याचे ठोस उत्तर आतापर्यंत कुणीच दिले नव्हते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते असीत कुमार मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये दयाबेन या मालिकेत पुन्हा दिसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निर्माते असित कुमार यांनी सांगितले की, ‘दयाबेन या व्यक्तिरेखेला मालिकेत परत आणण्यासाठी आम्हाला ठोस असे कोणतेच कारण मिळत नव्हते. मालिकेतील प्रत्येक कलाकारांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते. २०२०-२१ हे वर्ष आम्हा सर्वांसाठी खूपच खडतर होते; पण आता २०२२ मध्ये ही परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आता योग्य वेळ आली की, मालिकेतील लोकप्रिय व्यक्तिरेखा दयाबेन हिला परत आणले जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा जेठालाल आणि दयाबेन ही जोडी इतर कलाकारांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होईल.’

https://www.instagram.com/p/Ced_luylUXq/?utm_source=ig_web_copy_link

आता लवकरच दयाबेन या मालिकेत परतणार असल्याच्या बातमीमुळे मालिकेच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. नुकताच याबाबतचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत दयाबेन ही लवकरच गोकुलधाम सोसायटीमध्ये परत येत असल्याचे दिसत आहे. यात जेठालाल हा सुंदरलालसोबत फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. त्यात सुंदरलाल सांगतो की, दयाबेन लवकरच मुंबईत येणार आहे. मी स्वत: तिला घेऊन येणार आहे. त्याचवेळी गोकुलधामच्या गेटवर एक गुजराती महिला साडी घालून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून दयाबेन असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. सुंदरलालने दिलेली ही खूशखबर ऐकून जेठालाल आणि गडा कुटुंबातील सर्व सदस्य फार खूश असल्याचे दिसत आहे; परंतु दयाबेन हे पात्र कोण साकारणार? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. दिशा वकानी ही कमबॅक करणार की नाही? याबाबतही अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, दयाबेन परत येणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CcPimIXvdZQ/?utm_source=ig_web_copy_link

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू झाल्यापासून दयाबेन ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. दिशाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले. दिशा वकानी २०१७ मध्ये प्रसूती रजेवर गेली होती. तेव्हापासून दयाबेन हे पात्रदेखील मालिकेतून गायब झाले आहे. दिशा मुलीच्या संगोपनात आणि घरातील जबाबदारीत व्यग्र झाली. दिशाने २०१९ मध्ये या मालिकेमध्ये थोड्यावेळासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा ती मालिकेत दिसलीच नाही. या मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्यात ते अयशस्वी ठरले.

कोण साकारणार दयाबेन?

आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन ही व्यक्तिरेखा परतणार हे तर नक्की झाले आहे; परंतु ती भूमिका दिशा वकानीच साकारणार की नवीन चेहरा दिसणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दयाबेन ही व्यक्तिरेखा दिशा वकानीच साकारणार का, असा प्रश्न या मालिकेचे निर्माते असित मोदी यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, ‘दयाबेन म्हणून दिशा वकानीच येणार की नाही, हे मलाही अद्याप माहिती नाही. दिशाजींबरोबर आमचा उत्तम संवाद सुरू आहे. त्या अजूनही आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. दिशा वकानी यांचे लग्न झाले असून त्यांना आता लहान मुलगीदेखील आहे. त्यामुळे ती कौटुंबिक जबाबदारींमध्ये व्यग्र आहे. आपल्या प्रत्येकावर व्यक्तिगत आयुष्याच्या देखील जबाबदाऱ्या आहेत. तशाच त्यांच्यावरदेखील आहेत. त्यामुळे दिशा वकानीच दयाबेन म्हणून परतणार का हे मी आता सांगू शकणार नाही; परंतु मालिकेत दयाबेन ही पात्र परतणार हे नक्की. दयाबेन परतल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा एकदा नव्या दमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सिद्ध होणार आहोत.’

https://www.instagram.com/p/Cc7VnQxL8tk/?utm_source=ig_web_copy_link

Share