सुनील प्रभूंची प्रतोद पदावरून एकनाथ शिदेंकडून उचलबांगडी

मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता दर तासाला वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

शिवसेनेमध्ये  बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू  यांनी शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असतानाच शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करुनही आमदार परत येत नसल्याने बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे देखील अॅक्शनमोडमध्ये आहे आहेत.

Share