एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. नवे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, हे सर्व तर्क-वितर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. आज गुरुवारी (३० जून) संध्याकाळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस या सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. फडणवीस यांनी अचानक धक्कातंत्र वापरले आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. शिंदे गटाला भाजप समर्थन देणार असल्याचे सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचेही स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे. आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहेत. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. भाजपने हा निर्णय केला की, शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपचे काही लोक या मंत्रिमंडळात येतील. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी स्वत: बाहेर राहणार आहे; पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार, असे फडणवीस म्हणाले.

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले. त्यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले होते. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीकडे बघून मतदान केले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर शिवसेनेने विचार बदलला. या निवडणुकीत शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या तर भाजप-शिवसेना युतीने १६१ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये अपक्षांची संख्या एकत्र करून १७० संख्याबळ होत होते. या मोठ्या विजयानंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होईल, अशी आशा होती. मात्र, निकालाचे आकडे पाहिल्यानंतर शिवसेनेने विचार बदलला आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या उपस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे जाहीर केले होते. मात्र, आमच्या अनेक वर्षांच्या मित्रपक्षाने म्हणजेच शिवसेनेने वेगळा मार्ग पत्करत महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरुवातीपासून विसंवाद होता. या सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सांगत होते; पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे ऐकले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन सरकार स्थापन केले. या अडीच वर्षाच्या काळात राज्याची प्रगती झाली नाही. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली होती. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासही मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती. मात्र, हे निर्णय अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे पत्र पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. तरीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय अवैध ठरले आहेत. आता हे निर्णय पुन्हा नव्याने घ्यावे लागतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांची मोट बांधण्याची जी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बजावली, ती भूमिका आता देवेंद्र फडणवीस सांभाळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share