महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक काल पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. यात अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करुन आभार मानले आहेत. MCA च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल MCA च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसंच एमसीएचे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं. असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता #MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Share