इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक लवकरच लॉन्च करणार : नितीन गडकरी

पुणे : इथेनॉल आणि मिथेनॉल या पर्यायी इंधनानंतर आता भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांना खूप महत्त्व येणार आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसनंतर लवकरच मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रकही लॉन्च करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार होते. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, साखर आयुक्त शेखर गायकवाड, खासदार श्रीनिवास पाटील, साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते.

विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करणार : शरद पवार

शरद म्हणाले, विदर्भातील शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक शाखा  लवकरच सुरू केली जाईल. या शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे दिले जाईल. साखर कारखान्यांना उच्च आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचा विचार आहे. देशाच्या साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा विक्रमी साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार ९० लाख टनांपेक्षा जास्त साखर निर्यात होऊ शकेल, असा अंदाज आहे. या एकूण साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ५० टक्के आहे, ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. महाराष्ट्रात आज आखेर १३७० लाख टन गाळप झाले असून १६८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सुमारे पंधरा लाख टन उसाचा वापर इथेनॉल साठी करण्यात आला आहे. राज्याचा विचार करता ६४ लाख टन साखर निर्यात तिचे करार झाले असून, ४० लाख टनाची साखर राज्यातून निर्यात झाली आहे, असेही पवार म्हणाले.

याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, मी तीन वर्षांपूर्वी जेव्हा ई-व्हेईकल्स वापरासंबंधी बोललो होतो तेव्हा लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; पण आता पाहा ई-व्हेईकल्सला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. अनेक जण इलेक्ट्रिक वाहने घ्यायला वेटिंगवर आहेत. साखर कारखान्यांमध्ये साखर आता उपपदार्थ आणि इथेनॉल मुख्य उत्पादन झाले आहे. जागतिक बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती पाहता यापुढे इथेनॉल निर्मितीवरच भर द्यावा लागणार आहे, असे सांगून ते म्हणाले, भारताला दरवर्षी २९० लाख टन साखरेची गरज भासते, त्यामुळे तेवढी साखर निर्मिती केल्यानंतर उरलेल्या सर्व उसापासून इथेनॉल निर्मिती करावी लागणार आहे, तरच साखर उद्योग बदलत्या काळात टिकेल आणि देशाच्या विकासात मोठी आर्थिक भर घालेल. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. मात्र, या राज्यातून देशाच्या इतर राज्यांमध्ये इथेनॉलची वाहतूक करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कारखान्याकडील इथेनॉलचा उठाव नियमित होत नसल्याच्या तक्रारी आहेत; पण ही तक्रार दूर करण्यासाठी इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांना न देता ते थेट तेल शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यांना दिले जाईल आणि त्याच ठिकाणाहूनच इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करून देशभरात वितरण केले जाईल.

गडकरी म्हणाले, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) शेती क्षेत्राचे योगदान १२ टक्क्यांवर आले आहे. हे योगदान वाढवायचे असेल तर ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी शेती आधारित ऊर्जा उद्योग वाढवला पाहिजे. अतिरिक्त ऊस, तांदूळ, गहू, मका आदी पासून इथेनॉल, बायो सीएनजी सारखे ऊर्जानिर्मितीचे स्त्रोत वाढवले पाहिजेत. २०२०-२१ मध्ये भारताने सुमारे ५५ अब्ज डॉलर किंमतीच्या पेट्रोलियम पदार्थांची आयात केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर परकीय चलन तेल आयातीवर खर्च करणे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे तेलाची आयात कमी करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी आपल्याला इथेनॉल निर्मिती वाढवली पाहिजे. बायो सीएनजीवर भर दिला पाहिजे. नजीकच्या भविष्यात देशातील सर्व दुचाकी, चार चाकी गाड्या, ट्रक आणि रेल्वे सुद्धा बायो सीएनजी किंवा इथेनॉलवर चालविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. फेक्स इंजिनचे तंत्रज्ञान वापरून सर्व गाड्या शंभर टक्के इथेनॉलवर चालवायच्या आहेत. त्यासाठी देशातील सुमारे ५५० कारखान्यांनी उसापासून साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती केली पाहिजे.

ब्राझीलसारखा साखर निर्मितीत आघाडीवर असणारा देश जेव्हा जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा साखरेऐवजी इथेनॉल निर्माण करतो आणि तेलाच्या किमती घसरल्या तर साखर साखर निर्माण करतो. जे ब्राझील करू शकतो, तेच आपणही केले पाहिजे. जागतिक बाजारातील बदल लक्षात घेऊन बाजाराला काय अपेक्षित आहे, त्याप्रमाणे आपण सध्या साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करून कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजेत. मागील पंधरा वर्षे कारखाने तोट्यात होते. यावर्षी पहिल्यांदाच हे कारखाने फायद्यात आलेले आहेत. देशातील १८८ लोकसभा मतदारसंघात ऊस उत्पादक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कोणत्याही सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही गडकरी यांनी सांगितले.

Share