मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेला ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’ हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईल. असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’चा शुभारंभ बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे उपमहापौर ॲड.सुहास वाडकर, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.संजीवकुमार, उपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, डब्ल्यूआरआय इंडियाच्या सिटीज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माधव पै, नागरी विकास उपक्रम प्रमुख लुबायना रंगवाला, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक चैतन्या कानुरी, सल्लागार कौस्तुभ गोसावी, पर्यावरण सल्लागार तन्मय टकले आदी उपस्थित होते. वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे म्हणाले की, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्यशासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Today, we launched Mumbai EV Cell, a @mybmc & @WRIIndia partnership, to accelerate EV transition & adoption. With experts working towards sustainable mobility, this cell will assist in creating a network of charging stations, supporting battery development & market penetration. pic.twitter.com/zBIdUajdyT
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 23, 2022
यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या ३८६ बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन २०२७ पूर्वी १०० टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.