‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न; आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी : जयंत पाटील

मुंबई : बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे जे विधान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज केले आहे, ते त्यांनी पक्षांतर्गत चर्चा आणि विचार करूनच केले असेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या आम्ही ‘वेट आणि वॉच’ या भूमिकेत असल्याचे पाटील म्हणाले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे. शिंदे गटाचे संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठ खिंडार पडले आहे. सध्या आपल्यामागे ४६ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा सध्या गुवाहाटी येथे असलेले एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय खलबतं सुरू आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी (२३ जून) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व बंडखोर आमदारांची असेल, तर त्याआधी त्यांनी मुंबईत यावे आणि त्यांची मागणी अधिकृतपणे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल; पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खा. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेणार पाहू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. जर महाविकास आघाडी सरकार पडले तर आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. मात्र, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असेही पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या ठिकाणी तब्बल दोन तास राजकीय खलबतं सुरू होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल.

दरम्यान, सध्या चाललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे,’ असे जयंत पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share