ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फूट; जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन

ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत असून, सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. गुरुवारी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच आपले समर्थन असल्याचे जाहीर केले. याशिवाय ठाणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिंदे समर्थनाचे मोठे फलक लागले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांकडून शिंदेंबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखले जाते. एरवी जिल्ह्यात झालेल्या बंदनंतर शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसल्या; पण आता शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसैनिकांमधून अद्यापही प्रतिक्रिया उमटली नव्हती. यातूनच जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली होती; परंतु त्यास पदाधिकाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. काही पदाधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवत मौन बाळगले होते. त्यातच गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांंनी उघडपणे शिंदे यांना समर्थन जाहीर केले. म्हस्के यांनी समाजमाध्यांवर पोस्ट टाकली असून, त्यात त्यांनी ‘आम्ही तुमच्यासोबत…आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना….’ असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

 

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले असताना त्यावर काही शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘तुम्ही शिवसेना सोडाल; पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही,’ अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.

ठाण्यात झळकले “आम्ही भाई समर्थक”चे बॅनर
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरू झाली आहे. ठाणे शहरात शिंदे यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. ‘वाघ एकला राजा’ असे या बॅनरवर लिहिले आहे. ‘आम्ही भाई समर्थक’, ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ असा संदेश या बॅनरवरून देण्यात आला आहे. कट्टर विरुद्ध बंडखोर यांच्यात रंगलेल्या या बॅनर युद्धात ठाण्यातील कट्टर मात्र पिछाडीवर पडल्याचे सध्याचे चित्र आहे.

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेना विभागली; शिंदे-ठाकरे समर्थक भिडले

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांतील शिवसैनिकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संभ्रम आहे. येथील शिवसैनिकांवर एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड असली तरी मंगळवारच्या राजकीय भूकंपानंतर मात्र अंबरनाथ, बदलापुरातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अंबरनाथमधील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगला आहे. एका माजी नगरसेवकाने ‘आम्ही शिंदे साहेबांसोबत’ अशी पोस्ट केल्यानंतर अंबरनाथमधील युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मात्र ‘आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत’ असल्याची पोस्ट करून प्रत्युत्तर दिल्याने शहरात दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे.

बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांवर गेली जवळपास २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातिल शिवसेनेची सूत्रे आली. येथील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, नगराध्यक्ष निवडीपासून ते निवडणुकीत तिकीट वाटपापर्यंत एकनाथ शिंदे यांचा आदेश शिवसैनिक मान्य करत असे. मात्र, मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या तिन्ही शहरांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

अंबरनाथ येथील शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर गट आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर या दोन गटांतील वाद सर्वश्रृत आहे. त्यात आमदार डॉ. किणीकर हे शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे समर्थकांकडून आ. किणीकर यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुठलाही प्रकार घडला नाही. मात्र, एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या पूर्वेतील एका माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर ‘आम्ही शिंदे साहेबांसोबत’ अशी पोस्ट केली होती. त्यावर शहरातील युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उत्तर देत आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत असल्याची प्रतिक्रिया आमदार किणीकर यांच्या गटातील माजी नगरसेवकाच्या पोस्टला दिली.

अंबरनाथच्या पश्चिम भागातील काही नगरसेवक तसेच पूर्व भागातील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख या दिग्गजांसह माजी नगरसेवकांच्या मोठ्या गटाने आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. तर पश्चिमेचा गट शिंदेंसोबत जाणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक शिवसेनेत आणि पदाधिकाऱ्यांमध्येही मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही आमचे नेते आहेत. या घडामोडीनंतर ‘मातोश्री’ आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी आम्ही काल भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन पक्ष व्यवस्थित चालावा, हीच आमची इच्छा आहे.

Share