नांदेड : राजकीयदृष्ट्या आमची आणि केंद्र सरकारमधील नेत्यांची भूमिका वेगळी आहे. मात्र, जिथे विकासकामांचा प्रश्न येतो तिथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी हे नेहमी सहकार्याची व सामंजस्याची भूमिका घेत असतात. नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच केंद्र सरकारमधील नेतृत्वाने आणि इतर सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल. हाच दृष्टिकोन जर देशाच्या पातळीवर केंद्र सरकारने ठेवला तर देशाचा चेहरा बदलण्याची जी सर्वांची अपेक्षा आहे, ती आपण पूर्ण करू, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवसेना खासदार हेमंत पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा शनिवारी (१४ मे) सकाळी खा. शरद पवार यांच्या हस्ते थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. या सोहळयात अभासी पद्धतीने सहभागी झालेले केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची खा. शरद पवार यांनी स्तुती करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यासह केंद्र सरकारला शाब्दिक चिमटे काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते; पण त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, अर्जुन खोतकर, कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अनसूया खेडकर, पाशा पटेल, संत बाबा बलविंदरसिंगजी, सूर्यकांत देसाई गुरूजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांच्यासह आजी- माजी लोकप्रतिनिधींची आणि शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. प्रारंभी गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
‘गोदावरी अर्बन’ची मुक्तकंठाने स्तुती
याप्रसंगी खा. शरद पवार म्हणाले की, दहा वर्षांच्या काळात ‘गोदावरी अर्बन’ने मोठा नावलौकिक मिळवला आहे. नांदेड ही गोदावरी नदी आणि गुरु गोविंदसिंग यांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात ‘एमजीएम’ने नांदेडचा नावलौकिक वाढवला आणि आता ‘गोदावरी अर्बन’ने सहकार क्षेत्रात चमत्कार करून नावलौकिक मिळविला आहे. यामुळे नांदेडची ओळख अनेक राज्यांमध्ये झाली. ‘गोदावरी अर्बन’ने त्यांची ओळख महाराष्ट्रासह इतर राज्यातही निर्माण केली आहे. निसर्गाच्या लहरीवर शेती असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीवर भार न टाकता उद्योगाकडे वळावे. यासाठी आर्थिक भाग भांडवल देण्यासाठी ‘गोदावरी अर्बन’ सारख्या संस्था उभ्या आहेत; परंतु घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर करून त्या कर्जाची व्याजासह परतफेड वेळेत करावी, असे आवाहनही पवार यांनी केले.
सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक हवा : शरद पवार
समाजातील हजारो सामान्य लोकांना आर्थिक मदत करून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘गोदावरी अर्बन’ ही संस्था एक चांगले काम करत आहे. दहा वर्षांमध्ये या संस्थेने नावलौकिक कमावत सर्वसामान्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे धाडस करून दाखवले आहे. सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नाहीत, अशी खंत व्यक्त करून खा. शरद पवार म्हणाले, सहकारी संस्था मजबूत करून ग्रामीण भागातील लोकांना आधार आणि सन्मान देण्याची गरज आहे. सहकार चळवळीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. शंभर वर्षांपासूनचा मोठा इतिहास सहकार चळवळीला आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. आता बॅंकांचे क्षेत्र वाढले असून सहकारी बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्थाकडे बघण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टिकोन अधिक चांगला असायला पाहिजे. कारण या बँका लहान माणसाला आर्थिक शक्ती देणाऱ्या नाड्या आहेत. सहकार चळवळीचे प्रश्न मांडण्याचा व ते सोडविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असल्याचे आणि याबाबतीत नितीन गडकरी यांची भूमिका नेहमीच सहकार्याची असते, असेही पवार यावेळी म्हणाले.
नांदेड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनातून प्रक्रिया करणारे उद्योग या भागात यायला हवेत. साखरेसह इतर उत्पादने घेणे साखर कारखान्यांनी सुरू केले, त्याप्रमाणे आता सोयाबीन, हळद या पिकांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती करून याचेही उत्पादन व त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी चालना दिली पाहिजे. शेतकरी तसेच तरुण, महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करून त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगून खा. शरद पवार म्हणाले, देशातील सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार क्षेत्र अतिशय महत्त्वाचे काम करत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम सहकार क्षेत्र ख-या अर्थाने बँकांचा व अन्य संस्थांच्या माध्यमातून करत आहेत यामुळे महाराष्ट्र सहकाराचा पाया मजबूत झाला आहे. सहकार क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी सर्वांनीच व्यापक होणे आवश्यक आहे. शेतीला जोड उद्योग म्हणून तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे. यासाठी बँकांनी पतपुरवठा करावा, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
नांदेड-नागपूर महामार्ग झालाय, आता इंदौर-हैदराबाद एक्स्प्रेसची आखणी सुरू -गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभासी पद्धतीने या समारंभात सहभाग घेत ‘गोदावरी अर्बन’ बँकेला शुभेच्छा दिल्या. राज्यात विविध क्षेत्रात शेती संदर्भात उद्योग निर्माण झाले पाहिजेत. सध्या दळणवळणाच्या माध्यमातून रस्ते जोडणी सुरू आहे. नांदेड -नागपूर महामार्ग झाला आहे. आता इंदौर-हैदराबाद एक्स्प्रेसची आखणी सुरू आहे. भविष्यात नांदेडलादेखील एक्स्पोर्ट सेंटर होईल. येणा-या काळात नांदेडसारख्या शहरात ड्रायपोर्ट सुरू करू, असे सांगून गडकरी यांनी खा. हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी गुडविल कमावले आहे, लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्यांच्यात चांगले नेतृत्व गुण आहेत. यामुळे कमी काळात ‘गोदावरी अर्बन’ने हे यश मिळविले, असे गौरवोदगार काढले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘गोदावरी अर्बन’चा विस्तार महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे गुजरात राज्यात होतो, ही अभिमानास्पद बाब आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षा राजश्री पाटील यांचे खास कौतुक केले.
यावेळी सतीश मराठे, काकासाहेब कोयटे आदींनी मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्याला जोडून आयोजित केलेल्या सहकार परिषदेत विविध मान्यवरांनी सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. ‘गोदावरी अर्बन’च्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी आभार मानले.