मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार २५ हजार पत्रं

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचा पाणीप्रश्न उचलून धरला आहे. यासाठी आज शहरातून मोठी संघर्ष यात्रा सुरु करण्यात आली आहे. शहरातील ५५ वॉर्डांमध्ये मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलतं करणार आहे. नागरिकांच्या पाणीसमस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार आहे.  जवळपास २५ हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार आहेत. औरंगाबादकरांची ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.

शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून आज मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर ताशेरे ओढले. आज पवननगर, रायगडनगर, श्रीकृष्ण नगर, आयोध्यानगर, बळीराम पाटील शाळा परिसरातील रहिवाशांकडून उद्धव ठाकरेंना पाठवण्यासाठी पत्र लिहून घेतले गेले आहेत. नागरिकांनी लिहिलेली ही पत्र मनसेचे कार्यकर्ते रिकाम्या हंड्यांमध्ये गोळा करत आहेत. नागरिकांनी तीव्र भावना या पत्राद्वारे व्यक्त केल्या असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद या पाणी संघर्ष यात्रेला मिळाला आहे. शहरातून अशा प्रकारे २५ हजार पत्र गोळा केले जाणार आहेत.

पत्राद्वारे नागरिकांच्या तीव्र भावना आणि रोष

अनेक महिलांनी पत्र लिहीत “आम्हाला आठ दिवसानंतर पाणी येते, पाणी गढूळ येते, पाण्याला फोर्स येत नाही, कधी-कधी अर्ध्या रात्री पाणी येते, पाणी ज्या वेळेस येते त्या वेळेस लाईट गेलेली असते, पाणीपट्टी खूप जास्त आहे, आम्हाला टॅंकरने पाणी घ्यावे लागते, आम्ही मध्यमवर्गी असून आम्हाला हा खर्च परवडत नाही.” अशा एक ना एक अनेक समस्या महिलांनी पत्रामध्ये मांडलेल्या आहेत.

औरंगाबादची पाणीपट्टी ५०% कमी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भरमसाठ पाणी पट्टी आणि विलंबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचा वाढता असंतोष पाहता पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. यात नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागेपर्यंत औरंगाबादची पाणीपट्टी निम्म्याहून कमी करण्यात आली आहे. आधीची पाणीपट्टी ४०५० एवढी होती, ती आता २००० एवढी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा विराट मोर्चा

भाजपनेदेखील पाणी प्रश्नी अनेकदा आंदोलन केले आहे. येत्या २३ मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत विराट मोर्चा काढला जाणार आहे. २५ वर्षांपासूनच्या पाणी समस्येचा निषेध करण्यासाठी २५ हजार महिला हंडे घेऊन या मोर्चात सहभागी होतील, असे भाजप आमदार अतुल सावे यांनी सांगितल आहे.

Share