सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; फेसबुक लाइव्हद्वारे राजीनामा

चंदीगड : राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू असतानाच दुसरीकडे पंजाबमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीपासून सुनील जाखड आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी जबाबदार असल्याची टीका जाखड यांनी केली होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने २६ एप्रिलला जाखड यांच्यावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

चिंतन शिबीर ही निव्वळ औपचारिकता
सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेस पक्षातील उणिवांवर बोट ठेवले आहे. काँग्रेसचे उदयपूरमधील शिबीर ही औपचारिकता आहे. काँग्रेसला चिंतन शिबीर नाही तर चिंता शिबिराची गरज आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ३९० मतदारसंघात दोन हजार मते मिळाली आहेत. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सरकार विरोधात लाट असूनही पक्षाला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टींसाठी पक्ष नेतृत्त्वाला दोष देता येणार नाही, इतर अनेक उणीवा आहेत, असे जाखड यांनी म्हटले आहे. ‘गुड बाय काँग्रेस आणि या प्रकारे चिंतन शिबीर घेऊन काही होणार नाही. काँग्रेस पक्षाचे ज्यांनी नुकसान केले त्यांना नोटीस द्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींचे कौतुक; हरीश रावत, अंबिका सोनी यांच्यावर टीका

सुनील जाखड यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांनी हुजरेगिरी करणाऱ्यांपासून सावध राहायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय यावेळी त्यांनी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि अंबिका सोनी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, पंजाबचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट करत काँग्रेसने सुनील जाखड यांना गमावायला नको. काही मतभेद असतील तर ते चर्चा करून सोडवता येतील, असे म्हटले आहे.

Share