इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

मुंबई : मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे.

इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याचे वृत्त असून यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९ ८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती . तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस सकाळी कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एस. टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

Share