नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कटीकल शंकरनारायण अर्थात के. शंकरनारायण यांचे रविवारी (२४ एप्रिल) रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळमधील पालघाट येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१० ते २०१४ या काळात के. शंकरनारायण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
के. शंकरनारायण हे केरळ विधानसभेवर चार वेळा निवडून आले होते. केरळ सरकारमध्ये त्यांनी अर्थ, कृषी, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते. महाराष्ट्राशिवाय नागालँड, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गोवा या राज्यांचेही ते राज्यपाल होते. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. शंकरनारायणन हे लोकप्रिय नेते होते. केरळ विधानसभेचे दीर्घ काळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासक होते. महाराष्ट्रातील आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले. आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली, अशा शब्दांत भगतसिंह कोश्यारी यांनी के. शंकरनारायण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.