मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून समन्स

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून समन्स जारी करण्यात आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांचे नाव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जून रोजी संजय पांडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आले आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरणात पांडे यांना ईडीने समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यांच्यावर भाजपकडून बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबंधित घोटाळा प्रकरणात संजय पांडे यांना  ईडीने हे समन्स पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

Share