शिंदे-फडणवीसच ठरले ‘बाहुबली’; शिंदे सरकारने १६४ मते मिळवत जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने काल पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने महाविकास आघाडीला धक्का देत आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे गट आणि भाजपने बहुमतापेक्षा जास्त म्हणजे १६४ मते मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशानुसार विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (रविवार) भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (४ जुलै) एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. यावेळी भाजप-शिंदे सरकारने १६४ मतांसह बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने सत्ताधारी शिंदे गट, भाजप आणि काही अपक्ष आमदार मिळून एकूण १६४ मते पडली, तर या ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीसह आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ९९ आमदारांनी मतदान केले. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे मिळून तीन आमदार तटस्थ राहिले. मतदानानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते आणि विरोधात ९९ मते पडल्याचे सांगून हा ठराव शिंदे सरकारने जिंकला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषित केले.

काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज मोठी परीक्षा होती. मात्र, काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १६४ मतांनी सहज जिंकल्यानंतर तशी ही लढाई सोपी झाली होती. अपेक्षेप्रमाणे शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने १६४ मते पडली. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी विरोधी महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही.

१० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ५० आमदारांना घेऊन ३० जून रोजी भाजपसोबत सरकार स्थापन केले. याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना आज बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. शिंदे-फडणवीस सरकारने काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विश्वासदर्शक ठरावही जिंकला.

आमदार संतोष बांगरही एकनाथ शिंदे यांच्यासोबत; शिवसेनेला आणखी एक धक्का
त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून, शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी शिंदे गटाचे भरत गोगावले यांची निवड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवली आहे. कट्टर शिवसैनिक आणि कळमनुरी (जि. हिंगोली) चे आमदार संतोष बांगर आणि लोहा-कंधार  (जि. नांदेड) चे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे दोघे शिंदे गटात सामील झाले आहेत. आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यापूर्वी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हेदेखील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. काल आ.संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले होते. आज बांगर यांनी शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज सभागृहात बहुमत चाचणीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही आमदार आपला अनुक्रमांक उच्चारत असताना विरोधी बाकांवरील आमदारांनी घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा ‘ईडी-ईडी’ अशा घोषणा देण्यात आल्या; पण आज आ.यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिले. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा आ. यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

उशिरा आल्याने ‘हे’ आमदार मतदानाला मुकले
दरम्यान, बहुमत चाचणीसारखी मोठी घटना घडत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना मतदान करता आले नाही. काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी हे आमदार उशिरा आल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर हे कॉँग्रेसचे दोन आमदार कालही अनुपस्थित होते आणि आजही अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी गेल्या आहेत.

Share