राज्यात ‘या’ तारखेपासून इंधन स्वस्त होणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेनुसार सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा  व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना वित्त विभागाकडून जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे.राज्य सरकारच्या सीएनजीवरील कर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहेत.

नेमकी घोषणा काय ?
अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूचा पीएनजी म्हणजेच घऱगुती वापर होतो. तसेच सीएनजीवर चालणारी मोटार वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर साडे तेरा टक्केवरून ३ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधिमंडळात आज अजित पवार यांनी तशी घोषणा केली.

Share