गणेश नाईकांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

मुंबई : भाजपचे नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीस ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नकार दिला. त्यामुळे नाईक यांना दिलासा मिळालेला नाही. नाईक यांच्या अंतरिम जामिनावर येत्या २७ तारखेला सुनावणी होणार आहे.

नवी मुंबईतील एका महिलेने आठवड्याभरापूर्वी गणेश नाईक यांच्याविरोधात रिव्हॉल्वर दाखवून धमकावणे आणि बलात्काराचा आरोप केल्याने नाईक सध्या अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नाईक यांच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून नाईक यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत २७ तारखेपर्यंत पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात काय वाटते ? हे जाणून घेतल्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. जोपर्यंत पोलिस नाईक यांचा जबाब नोंदवत नाहीत तोपर्यंत त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात येणार नाही, अशी भूमिका कोर्टाने घेतली. आता या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २७ एप्रिललाच होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Share